दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ८५ वर्षीय आसाराम बापूला ३१ मार्च पर्यंत अंतरीम जामीन मंजूर झाला आहे, पण या काळात त्यांना आल्या अनुयायांना भेटता येणार नाही, असेही निर्देश देण्यात आलेले आहेत. सध्या त्यांच्यावर जोधपूरच्या आरोग्य मेडीकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात ते जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. आसाराम बापूला हृदयाशी संबंधित आजार आहे. याआधी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. अंतरिम जामीन देत असताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जेणेकरून त्यांच्यावर देखरेख ठेवता येईल.
१८ डिसेंबर रोजीच सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूला १८ दिवसांचा पॅरोल दिला होता. १ जानेवारी रोजी जोधपूर कारागृहात परतल्यानंतर आता पुन्हा एकदा अंतरिम जामीन देण्यात आला आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात वैद्यकीय उपचारांसाठी राजस्थान उच्च न्यायालयाने त्याला सात दिवसांचा पॅरोल दिला होता. गांधीनगर सत्र न्यायालयाने फेब्रुवारी २०२३ मध्ये आसाराम बापू या नावाने प्रसिद्ध असलेल्या आसुमल हरपलानी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. एका बलात्कार प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे एकेकाळी देशातील एक शक्तिशाली व्यक्ती असलेल्या आसाराम बापूचा अस्त झाला. बलात्काराच्या प्रकरणात आसाराम बापूची ही दुसरी शिक्षा होती. यापूर्वी, एप्रिल २०१८ मध्ये राजस्थानमधील जोधपूरच्या आश्रमात एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. २०१३ मध्ये आसाराम बापूवर जोधपूर आणि गांधीनगर येथे बलात्काराचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
जोधपूर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यापूर्वी आसारामची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तेव्हा तो निरोगी होता. त्याला कोणताही आजार नव्हता. तुरुंगात गेल्यानंतर अवघ्या एक महिन्यानंतर आसारामने प्रथमच आपल्या त्रिनाडी पोटशूळ आजाराबाबत सांगितले होते. 4 सप्टेंबर 2013 रोजी याचिका दाखल करताना त्यानी सांगितले होते की, ‘मी सुमारे 13 वर्षांपासून त्रिनाडी कॉलिक या आजाराने त्रस्त आहे. महिला डॉक्टर नीता गेल्या २ ते ३ वर्षांपासून माझ्यावर उपचार करत होत्या. माझ्या उपचारासाठी नीताला मध्यवर्ती कारागृहात 8 दिवस येण्याची परवानगी द्यावी. त्यावर वैद्यकीय मंडळाने आसारामची तपासणी केली. डॉक्टरांना असा कोणताही आजार आढळला नाही.