जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून आलेल्या कुशल होम शेफ्सनी आपल्या अप्रतिम पाककृतींच्या जादूने वातावरणात चवदार सुगंध दरवळवला. दैनिक दिव्य मराठी आयोजित ‘सुपर शेफ २०२५’ या अनोख्या कुकिंग स्पर्धेच्या पहिल्या ऑडिशनमध्ये सहभागी झालेल्या ३० स्पर्धकांनी केवळ ७५ मिनिटांत पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांना आधुनिकतेचा स्पर्श देत विविध आकर्षक आणि चविष्ट डिशेस सादर केल्या. ज्यांच्यात पाककलेची आवड आणि कौशल्य आहे, अशा व्यक्तींना एक उत्कृष्ट व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने दिव्य मराठीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
हॉटेल गेटवे येथे झालेल्या या पहिल्या ऑडिशनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून निवडलेल्या ३० उत्साही स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि आपली पाककला सादर केली. प्रत्येक स्पर्धकाला किचनमध्ये आवश्यक असणारे सर्व साहित्य, जसे की इंडक्शन आणि इतर उपकरणे त्यांच्या सोयीनुसार उपलब्ध करून देण्यात आली होती, ज्यामुळे त्यांना कोणताही अडथळा न येता आपले कौशल्य दाखवता आले. या स्पर्धेतील पदार्थांचे परीक्षण करण्यासाठी राजश्री अग्रवाल यांच्यासह फूड ब्लॉगर हर्षवर्धन शाही आणि हॉटेल गेटवेचे शेफ जितो थॉमस यांसारख्या अनुभवी परीक्षकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. परीक्षकांनी पदार्थांची चव, वापरलेली सामग्रीचे योग्य प्रमाण आणि आकर्षक मांडणी यांसारख्या महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करून स्पर्धकांचे मूल्यांकन केले.
संपूर्ण खान्देश आणि विशेषतः जळगाव शहरासाठी ही अत्यंत गौरवाची बाब आहे की, जळगावच्या वैशाली आनंद जैन यांनी या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले आहे. या मोठ्या यशानंतर त्यांची थेट निवड राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीसाठी झाली आहे. आता या स्पर्धेची अंतिम लढत २१ मे रोजी भोपाळ येथे रंगणार आहे, ज्यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट होम शेफ्स सहभागी होतील.
या अंतिम फेरीत परीक्षकांची भूमिका अधिक खास असणार आहे, कारण सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर, लोकप्रिय शेफ नीता मेहता आणि जाणकार फूड क्रिटिक अर्मीन अली हे या फेरीतील स्पर्धकांचे मार्गदर्शन आणि परीक्षण करणार आहेत. या कार्यक्रमासाठी झॉफ अप्लायन्स हे मुख्य प्रायोजक आहेत, तर धारा पॉवर्ड बाय, फिलिप्स (अप्लायन्स पार्टनर), चिंटू सिस्केट (क्लीनिंग पार्टनर), एक्सपर्ट (टॅलेंट पार्टनर), लाओला (ट्रॅव्हल पार्टनर) आणि माय एफएम (रेडिओ पार्टनर) यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे.
सौ. वैशाली जैन या जळगावातील प्रसिद्ध लिलम ड्रायफ्रूट्स शॉपीचे संचालक आनंद जैन यांच्या पत्नी आणि नेरी (ता. जामनेर) येथील सुप्रसिद्ध डॉ. एल. यू. जैन यांच्या स्नुषा आहेत. सौ. वैशाली जैन यांनी आपल्या या यशाचे श्रेय आपल्या सासू सौ. सरला जैन आणि मुलगा चि. तनिष यांच्या सततच्या पाठिंब्याला दिले आहे, ज्यांनी नेहमीच त्यांना अशा नवनवीन गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित केले. सौ. वैशाली यांना या आधीही कुकिंग मध्ये बरीच बक्षिसे मिळालेली आहेत, ज्यामधे ‘लोकमत आयोजित खान्देश किचन क्वीन अवार्ड’, ‘JITO आयोजित स्पर्धेत झोनल level ला निवड’ समाविष्ट आहेत.
सध्या त्या ‘लिलम बेकर्स’ (गणपती नगर) या केक शॉप च्या संचालिका म्हणून कार्य बघत आहेत.