पारोळा, प्रतिनिधी | पंचायत समितीने शिक्षण विभागाने तालुक्यातील १० गट साधन केंद्रातून प्रत्येकी एक उपक्रमशील शिक्षकाची निवड करून त्यांचा नुकताच सत्कार केला आहे. यात शिरसोदे केंद्रातून बहादरपूरचे सुनील चौधरी यांची जिल्हा परिषद शाळा बहादरपूर येथील उपक्रमशील शिक्षक म्हणून निवड करण्यात येवून सत्कार करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की,पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने हा एक आगळा-वेगळा कार्यक्रम घेतला आहे. तालुक्यातील १० गटसाधन केंद्रातून प्रत्येक उपक्रमशील शिक्षक निवडत त्यांच्या गौरव केला. जिल्हा परिषद अध्यक्ष उज्वला पाटील यांनी या कार्याचे कौतुक करीत १० शिक्षकांचा सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. जिल्हा परिषद शाळा प्रगतीपथावर आणण्यासाठी केलेला हा स्तुत्य उपक्रम असून चांगल्या केलेल्या कामाची पावती आज या शिक्षकांना मिळत आहे.
सुनील मोतीलाल चौधरी बहादरपूर येथील जिल्हा परिषद शाळेत असून उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांना आज गौरवण्यात आले आहे. बहादरपूर शाळा डिजिटल असून अद्यावत आहे. विद्यार्थ्यांना संगणकाद्वारे शिक्षण ते देत असून जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यांचा सत्कार आज पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत करण्यात आला, याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष उज्वला पाटील अध्यक्षस्थानी होत्या. पंचायत समिती सभापती छाया पाटील, उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, माजी उपसभापती अशोक पाटील, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत चौधरी, विस्ताराधिकारी कविता सुर्वे, शांताराम पाटील, जिल्हा परिषद हिंमत पाटील, आदी यावेळी उपस्थित होते.