Home राजकीय सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड 

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड 


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक घडामोडी घडत असून, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. आज ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडणार असून, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाआधी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, मंत्री आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. पक्षाच्या गटनेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी मांडला, तर या प्रस्तावाला पक्षातील वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. यानंतर कोणताही विरोध न होता सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. या निर्णयामुळे पक्षातील नेतृत्वावरची जबाबदारी आता अधिकृतपणे सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीमध्ये पक्षाची सूत्रे सक्षमपणे सांभाळण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विधिमंडळ गटनेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता सुनेत्रा पवार सायंकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तास्थानील नेतृत्वाची धुरा त्यांच्या पत्नींकडे जाणार आहे.

राजभवनात आज सायंकाळी ५ ते ५.१२ या वेळेत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या वेळी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार असून, अतिरिक्त पदभार सांभाळणारे राज्यपाल आचार्य देवव्रत शपथ देणार आहेत. विशेष म्हणजे आज केवळ सुनेत्रा पवार यांचाच शपथविधी होणार असून, इतर कोणत्याही मंत्र्याचा समावेश या सोहळ्यात असणार नाही.

उपमुख्यमंत्रीपदासोबत सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणती खाती राहणार, याबाबतही स्पष्टता आली आहे. दिवंगत अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ खाते आणि इतर महत्त्वाची खाती होती. मात्र सध्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अर्थ खाते वगळता राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे कायम राहणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खात्याची जबाबदारी पुन्हा त्यांच्याकडे दिली जाऊ शकते, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.


Protected Content

Play sound