Home आरोग्य डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम 

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम 

0
113


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डीयूपीएमसी सभागृहात विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आरोग्यविषयक जागरूकता वाढवणे आणि समाजातील गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कुष्ठरोगाचे लवकर निदान, योग्य व वेळेवर उपचार, अपंगत्व प्रतिबंध तसेच कुष्ठरोगाशी संबंधित सामाजिक कलंक दूर करणे हा होता. कार्यक्रमासाठी संसाधन व्यक्ती म्हणून उपस्थित असलेले डॉ. सौरव मुले यांनी कुष्ठरोगाची कारणे, लक्षणे, निदान पद्धती, उपचार प्रक्रिया आणि पुनर्वसन याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार असून, वेळेत निदान झाल्यास अपंगत्व टाळता येते, यावर विशेष भर दिला.

डॉ. सौरव मुले यांनी आपल्या मार्गदर्शनात कुष्ठरोगग्रस्त रुग्णांच्या शारीरिक पुनर्वसनासोबतच सामाजिक पुनर्वसनामध्ये फिजिओथेरपिस्टची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. नियमित व्यायाम, योग्य थेरपी आणि मानसिक आधारामुळे रुग्णांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे संचालन आणि मार्गदर्शन डॉ. जिज्ञासा अत्तरदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. आश्लेषा यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपले शंकासमाधान करून घेतले. प्राध्यापक वर्गानेही या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा दिल्यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.


Protected Content

Play sound