जळगाव प्रतिनिधी । घरभाड्याचे पैसे पतीने सासूकडे दिल्याचा राग आल्याने सुनेने सासूचा इलेक्ट्रीक वायरीच्या सहाय्याने गळा आवळल्याची घटना 12 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जुन्या जळगावातील भोईवाडा येथे घडली होती. यात सासूला अत्यवस्थ परिस्थितीत उपचारार्थ शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्या जबाबावरुन सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मिनाबाई काशिनाथ कोळी (वय-50) ह्या मुलगा लक्ष्मण कोळी आणि सुन दिपाली कोळी सोबत जुन्या जळगावातील भोईवाड्यात राहतात. त्यांनी त्यांच्या मालकीचे काही घरे भाडे करारावर दिली असल्याने लक्ष्मण कोळी यांनी आई मिनाबाई कोळी यांच्याकडे रविवारी सायंकाळी घरभाड्याचे आलेले पैसे दिले. पतीने आईकडे घरभाड्याचे पैसे दिल्याने सासू आणि सूनेचे भांडण झाले. यात भांडणाचे हाणामारीत होवून सुन दिपालीने इलेक्ट्रिकच्या वायरच्या सहाय्याने सासू मिनाबाईचा गळा आवळला. यात त्या अत्यवस्थ झाल्याने मुलगा लक्ष्मण याने तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान या घटनेची माहिती पोलीस उपअधिक्षक निलाभ रोहन यांना माहिती मिळाल्यानंतर सहाकाऱ्यांसोबत भोईवाडा येथील घटनास्थळी भेट दिली. मिनाबाई यांच्या जबाब नोंदविला असून शनिपेठ पोलीसात सून दिपाली विरोधात जीवे ठार मरण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोउनि श्रीधर गुट्टे करीत आहे.