Home Agri Trends अंजनविहिरेत उन्हाळी हंगाम शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा; शेतकऱ्यांना मार्गदर्शन

अंजनविहिरेत उन्हाळी हंगाम शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा; शेतकऱ्यांना मार्गदर्शन


भडगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील अंजनविहिरे येथे तेलबिया संशोधन केंद्र जळगाव, कृषी विज्ञान केंद्र जळगाव आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. शेतकरी निलेश खंडेराव पाटील यांच्या शेतावर ‘खाद्यतेल अभियान तेलबिया उन्हाळी हंगाम २०२४-२५’ अंतर्गत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेत तेलबिया संशोधन केंद्राचे डॉ. गमे, संजय नंदनवार, दिनेश पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. शरद गोविंदराव जाधव, इंजि. वैभव सूर्यवंशी, कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी दिगंबर तांबे, मंडळ कृषी अधिकारी प्रताप खाडे, कृषी पर्यवेक्षक सुहास भालेराव, कृषी सहाय्यक सचिन पाटील, अजय साळुंखे, सिद्धेश्वर सावंत, सुखदेव गिरी आणि बीटीएम अमोल सोनवणे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिनेश पाटील यांनी ‘जमीन आरोग्य आणि बीज प्रक्रिया तंत्र: छोटे पण फायदे मोठे’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन केले. डॉ. गमे यांनी उन्हाळी तीळ आणि पिकांविषयी मार्गदर्शन करून तेलबिया पेरणी क्षेत्र वाढवण्याचे आवाहन केले. कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. शरद जाधव यांनी ज्वारी, गहू, मका लागवड ते काढणीपर्यंत एकात्मिक व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. तसेच, तणनाशकांची निवड आणि वापर याविषयी मार्गदर्शन केले. इंजि. वैभव सूर्यवंशी यांनी ‘यांत्रिक शेती: काळाची गरज’ या विषयावर माहिती देऊन बीबीएफ पेरणी पद्धतीचे फायदे सांगितले.

तालुका कृषी अधिकारी दिगंबर तांबे यांनी पीएम किसान योजना, केवायसी, ॲगिस्टॅक शेतकरी फार्मर आयडी या योजनांची माहिती देऊन महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक सुखदेव गिरी यांनी केले, तर बीटीएम अमोल सोनवणे यांनी सेंद्रिय शेतीची माहिती देऊन आभार मानले.


Protected Content

Play sound