जळगाव (प्रतिनिधी ) शहरात गेल्या आठवडयापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आज शहराचे तापमान 46.25 अंशांवर स्थिरावले आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी शहरातील रस्त्यांवरील वर्दळ घटली आहे.
सकाळी नऊ वाजल्यापासून शहरात उन्हाचे चटके जाणवतात.. सायंकाळी सहावाजेपर्यंत ह्या झळा सहन कराव्या लागतात. सकाळी दहा वाजेनंतर घराबाहेर पडताना दुपट्टा, टोपी, रुमालाची व्यवस्था करून निघावे लागत आहे. बाजारपेठ, मुख्य ठिकाणी दुपारपासून ते सायंकाळपर्यंत वर्दळ रोडावलेली दिसत आहे. दुपारी तर रस्त्यांवर अक्षरश: शुकशुकाट दिसून येतो. उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागल्याने सायकलस्वार व दुचाकीस्वारांना झळांच्या रूपाने सहन करावे लागतात. यामुळे दुचाकीस्वारांचा जीव मेटीकुटिला येत आहे. उन्हांपासून बचाव करण्यासाठी नागरिक सुती कपडे, गॉगल्स, रुमाल व टोप्यांचा वापर करताना दिसून येत आहे. युवती व महिला स्कार्पचा वापर करून उन्हांच्या तीव्रतेपासून दिलासा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहरातील हॉटेल्स व रस्त्याच्या कडेला थाटलेल्या थंड पेयाच्या दुकानांवर नागरिक गर्दी वाढली असून लिंबू-पाण्यासोबतच नागरिक कलींगडाच्या फळालाही पसंदी देत आहेत.