Home धर्म-समाज चुंचाळे गावात सुकनाथबाबा मूर्ती वर्धापन दिन भक्तिरसात साजरा

चुंचाळे गावात सुकनाथबाबा मूर्ती वर्धापन दिन भक्तिरसात साजरा


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या चुंचाळे गावात रविवारी (दि. २ नोव्हेंबर) श्री सुकनाथबाबा मूर्ती स्थापना वर्धापन दिनाचा रौप्यमहोत्सवी सोहळा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. संत परंपरेने पावन झालेल्या या भूमीत हजारो भाविकांनी उपस्थित राहून संतांचा आशीर्वाद घेतला.

चुंचाळे हे गाव “श्री सुकनाथबाबा तपोभूमी” म्हणून ओळखले जाते. दीडशे वर्षांपूर्वी समर्थ सुकनाथबाबा यांनी या भूमीत तब्बल २१ वर्षे कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या अध्यात्मिक तेजाने या भूमीला पावनता प्राप्त झाली. सन २००० मध्ये समर्थ वासुदेवबाबा यांनी आपल्या आजा गुरुंच्या पंचधातूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, आणि याच दिवशी त्यांचे समाधीप्राप्त होणे घडले. त्या दिवसापासून दरवर्षी हा दिवस “सुकनाथबाबा मूर्ती स्थापना वर्धापन दिन” म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.

या वर्षीच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी श्री सुकनाथबाबा, श्री रघुनाथबाबा, श्री समाधीवालेबाबा व श्री वासुदेवबाबा यांच्या मूर्तींना अभिषेक, स्नानविधी आणि पूजनाने झाली. त्यानंतर भक्तिमय वातावरणात आरती, भजन, भारूड व नामसंकिर्तन पार पडले. दुपारी महाआरतीनंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पंचक्रोशीतील गावांमधून आलेल्या भाविकांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.

श्री सुकनाथबाबा यांनी केवळ अध्यात्मच नव्हे, तर समाजोन्नती आणि शिक्षण क्षेत्रातही मौलिक कार्य केले. त्यांनी दीडशे वर्षांपूर्वी वृद्ध आणि निरक्षरांसाठी शाळा सुरू करून समाजातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यात शिक्षण, समाजसेवा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम दिसून येतो.

या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी श्री सुकनाथबाबा, श्री रघुनाथबाबा, श्री वासुदेवबाबा यांचे शिष्य, श्री वासुदेवबाबा भजनी मंडळ, तसेच चुंचाळे, बोराळे आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. या भक्तीमय उत्सवाने पुन्हा एकदा संतपरंपरेचा तेजस्वी वारसा उजाळला आणि श्रद्धा, एकता व भक्तीचा संदेश जनमानसात पोहोचविला.

चुंचाळे ही भूमी एकाच वेळी तीन संतांच्या कार्याने पावन झाली आहे – सुकनाथबाबा यांची तपोभूमी, रघुनाथबाबा यांची जन्मभूमी आणि वासुदेवबाबा यांची कर्मभूमी! संतांच्या या त्रिसंधीने चुंचाळे गावाचे आध्यात्मिक वैभव अधिकच उजळून निघाले आहे.


Protected Content

Play sound