जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भादली येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने धावत्या रेल्वे खाली झोकून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडलीय. याबाबत नशिराबाद पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मुरलीधर नारखेडे (वय 40, रा. नारखेडेवाडा भादली ता. जि.जळगाव) हे शहरातील आरसी बाफना ज्वेलर्समध्ये इलेक्ट्रिक वायरमन म्हणून कामाला होते. कौटुंबिक करणातून ते काही दिवसांपासून नैराश्येत होते. 27 जून रोजी रात्री 8.30 ते 9.30 वाजेच्या दरम्यान त्यांनी कुटुंबियांना सांगितले की, बाहेरून फिरून येतो. परंतू रात्री उशिरापर्यंत नारखेडे हे घरी परत न आल्याने त्यांच्या पत्नीने भाचा कपिल पाटील यांना बोलावून शोध घ्यावयास सांगितले. त्यानुसार श्री. पाटील यांनी नारखेडे यांचा सर्वत्र शोध सुरू केला. नशिराबाद- भादली दरम्यान रेल्वे ट्रॅकवर त्यांना रात्री 2 वाजेच्या सुमारास नरेंद्र नारखेडे यांचा मृतदेह मयत स्थितीत आढळून आला. याबाबत नशिराबाद पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आज दुपारी शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.