जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे गावात २७ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली असून ५० हजार रुपयांसाठी सासरच्या लोकांनी छळ केल्यामुळे मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या वडीलांनी केला आहे.
आसमाबी करीम शेख (वय २७, रा.आव्हाने, ता.जळगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. शहरातील पिंप्राळा हुडको येथी माहेर असलेल्या आसमाबी हीचा विवाह सन २०११ मध्ये आव्हानेतील ट्रकचालक करीम शेख याच्याशी झाला होता. मृत आसमाबी यांचे वडील अफजल खान उसमान खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही दिवसांपासूनच सासरच्या लोकांनी तीचा छळ सुरू केला होता. यानंतर गतवर्षी तीचा पती करीम शेख याच्यावर सिमेंट चोरीचा गुन्हा दाखल झाला. तेव्हा पासून त्याने आसमाबीला माहेरहुन ५० हजार रुपये आणण्याचा तगादा लावला होता. तसेच सहा महिन्यांपूर्वी असामाबी यांना जुळ्या मुली झाल्या होत्या. तेव्हापासून या ना त्या कारणावरुन तीचा छळ सुरू होता. अखेर या जाचास कंटाळुन शनिवारी आसमाबी यांनी दुमजली घराच्या दुसर्या मजल्यावरील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. असा आरोप उफजल खा यांनी केला आहे.
ही घटना समोर येताच माहेरच्या लोकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गाठुन आक्रोश केला. तसेच सासरच्या लोकांवर संतापही व्यक्त केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.