यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथे राहणार्या एका शेत मजुराने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
याबाबतचे वृत्त असे की, साकळी तालुका यावल येथील राहणारे डिगंबर भिका मराठे ( वय ४७ वर्ष ) या शेतमजुराने आज ११ जून रोजी रोजी सकाळी ६ वाजेच्या पुर्वी आपल्या राहत्या घरातील मधल्या खोलीत छताला बांधलेल्या झोक्याच्या दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली. मयताचा मोठा भाऊ नामदेव भिका मराठे हा मागच्या गल्लीत राहतो. सकाळी डेअरीवर दुध घेण्यासाठी लहान भाऊ मयत डिगंबर मराठे यांच्या घराकडुन जात असतांना त्याला आपल्या भाऊच्या घरासमोर गर्दी दिसुन आली असता, घरातील आतील खोलीचा दरवाजा आतुन बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घरातील छतवरून पाहीले असता डिगंबर मराठे हा छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. यामुळे त्यांनी नागरीकांच्या मदतीने डिगंबर मराठे यांचा मृतदेह खाली उतरविण्यात आला. मयताचे शवविच्छेदन साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात केले. या संदर्भात यावल पोलीसानी अकस्मात मृत्युची नोंद केली असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत. मयताच्या कुटुंबात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा यांचा समावेश आहे.