
जळगाव (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील गोरगावले प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स म्हणून काम करण्याऱ्या महिलेने फिनाईलच्या गोळ्या सेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. यासंदर्भात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, कांचन उमेश दाभाडे (वय 28, रा. गोरगावले ता.चोपडा) या गोरगावले प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स म्हणून गेल्या चार वर्षापासून कामाला आहेत. काल (गुरुवार) रात्री आठ वाजेच्या सुमारासकांचनने घरात असलेल्या फिनाईलच्या गोळ्या सेवन केल्या. थोड्याच वेळानंतर अत्यवस्थ जाणवू लागल्याने कांचनला तिच्या पती तातडीने ओम क्रिटिकल केअर सेंटर येथे उपचारार्थ दाखल केले. मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने उपचारादरम्यान, तिचा मृत्यू झाला. कांचन गेल्या चार वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स म्हणून कामाला होती. तिचे सासू-सासरे देखील प्राथमिक आरोग्य केंद्रात कामाला असल्याचे कळते. तर पती वाहन चालक असून दोघांना तीन वर्षाचा मुलगा आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. तर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. याबाबत जिल्हा पेठ पोलीस स्थानकात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.