जळगाव प्रतिनिधी | कर्जबाजारीला कंटाळून एका शेतकऱ्याने तापी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत तालुका पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फुलचंद ताराचंद सोनवणे (वय 59 रा. भोकर ता. जळगाव) हे शेतकरी असून त्यांची 6 एकर शेती आहे. त्यांनी भोकर विकास कार्यकारी सोसायटी मधून 3 लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जाची फेड होऊ शकत नसल्याने फुलचंद सोनावणे तणावात होते. 15 ऑगस्ट रोजीच्या रात्री १२ वाजेच्या सुमारास वयोवृद्ध आईला शौचास जाऊन येतो असे सांगून फुलचंद हे घरातून बाहेर पडले. मात्र एक तास होऊन आपला मुलगा घरी न आल्याने वयोवृद्ध आईने लहान मुलगा राघव सोनवणे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सर्व नातेवाईकांनी रात्रभर शोधाशोध सुरू केली. दरम्यान आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास तापी नदीच्या काठावर फुलचंद सोनवणे यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
कर्जबाजारीतून आत्महत्या केल्याचे मयताचे पुतणे पुंडलिक सोनवणे यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक भाऊ व वयोवृद्ध आई असा परिवार आहे. दोन्ही मुलं नाशिकला खासगी कंपनीत नोकरीला असल्याने पत्नी भिकुबाई सोनवणे या मुलाकडे राहायला गेल्या होत्या. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेचा प्राथमिक तपास हेड कॉन्स्टेबल लोखंडे आणि पो.ना. संदीप पाटील करीत आहे.