जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कांचन नगरातील ४८ वर्षीय प्रौढाने कृषी उत्पन्न बाजार समितीत कामाच्या ठिकाणी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रमेश सुकलाल राजपूत (वय ४८) रा. काचन नगर जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, रमेश राजपूत हे बुधवारी २ मार्च रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले होते. अन्य कर्मचाऱ्यांसोबत शिलाईसाठी बारदान त्यांनी काढले. यावेळी “मला जरा बरे नाही वाटत, मी आत जाऊन झोपतो” असे म्हणून रमेश राजपूत हे दुकानाच्या आत मध्ये गेले. बाकी कर्मचारी हे बाहेर बसून बारदान शिलाई करीत होते. काही वेळाने कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की, रमेश राजपूत हे बऱ्याच वेळपासून बाहेर आले नाही. सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांनी आत जाऊन बघितले असता, रमेश राजपूत हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. तातडीने कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली उतरविले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यावेळी नातेवाइकांनी एकच आक्रोश फोडला.
मुलाच्या विरहानंतर त्यांनीही घेतला गळफास
१४ जानेवारी रोजी रमेश राजपूत यांचा मुलगा यश राजपूत याने क्षुल्लक कारणावरून राहत्या घरात गळफास घेतला होता. या घटनेपासून यशचे वडील मयत रमेश हे तणावात होते अशी माहिती कुटुंबियांनी दिली. रमेश राजपूत हे अत्यंत मेहनती आणि मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान दिड महिन्याच्या काळातच मुलाच्या पाठोपाठ पित्यानेही जीवन संपविल्याने घरातील कर्ता पुरुष निघून गेला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.