पहूर येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर येथे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर पेठ संतोषीमाता नगरात राहणाऱ्या प्रिया राजेंद्र नवघरे (वय – ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. या विवाहितेने आपल्या राहत्या घराच्या वरील मजल्यावर साडीचा गळफास लावून  जीवनयात्रा संपविली आहे. प्रिया नवघरे या नेहमीप्रमाणे स्वयंपाकाची तयारी करत होत्या . काही कामासाठी त्या घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत गेल्या. मात्र दहा पंधरा मिनिटे होऊनही आई खाली का येत नाही , हे पाहण्यासाठी मुलगी वैष्णवी ( १४ वर्षे ) वरच्या खोलीकडे गेली . मात्र घराचा दरवाजा खिडकी आतून बंद असल्याने तिने आजी कुसुमबाई नवघरे यांना आवाज दिला. आजी कुसुम बाई आणि वैष्णवी यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र आतून कडी लावलेली असल्याने त्यांना दरवाजा उघडता येत नव्हता. त्यांच्या या आवाजाने पती राजेंद्र नवघरे वरती आले. त्यांनी ही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात शेजारील प्रशांत विठ्ठल कुमावत यांनी धाव घेऊन दरवाजा जोरात ढकलला. आत मध्ये प्रवेश करताच  प्रिया हि साडीचा गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत पाहताच सर्वांना एकच धक्का बसला. आईची ही स्थिती पाहून वैष्णवीने टाहो फोडला.

आजूबाजूचे लोक मदतीसाठी एकत्र आले. घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिस स्टेशन चे हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत घटनास्थळी दाखल झाले. प्रिया यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी डॉ. रविंद्र सुरडकर यांनी दिलेल्या खबरी वरून पहूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. मयत प्रिया यांच्या पश्चात पती, मुलगी वैष्णवी (१४ ), २ मुले पियुष ( ११ ) आणि साई ( ९ ) सासू -सासरे असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, सायंकाळी ५  वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

Protected Content