Home राष्ट्रीय देशात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा; घाबरून खरेदी टाळा : केंद्र सरकारचे आवाहन

देशात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा; घाबरून खरेदी टाळा : केंद्र सरकारचे आवाहन


नवी दिल्ली-वृत्तसेवा | देशात पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही कमतरता नसून कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी स्पष्ट माहिती केंद्र सरकारने बुधवारी दिली. पेट्रोल पंपांना पुरवठा करणाऱ्या टर्मिनल्सवरही इंधनाचा साठा मुबलक असल्याचे सांगत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून खरेदी (पॅनिक बाइंग) टाळावी, असे आवाहन करण्यात आले.

दिल्ली येथे झालेल्या आंतर-मंत्रालयीन ब्रीफिंगदरम्यान पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांत काही ठिकाणी अफवांमुळे पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागल्याचे दिसून आले. “पॅनिक बाइंगमुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगावा,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारच्या माहितीनुसार, भारताकडे वार्षिक सुमारे 26 कोटी टन कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, इराणसोबत इस्रायल आणि अमेरिकेच्या सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर होत असल्याचे मान्य करण्यात आले. विशेषतः स्ट्रेट ऑफ होर्मुझ या महत्त्वाच्या जलमार्गातून तेल वाहतूक प्रभावित झाली आहे. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 50 टक्के कच्चे तेल आणि 54 टक्के LNG याच मार्गाने आयात करतो. तरीही देशांतर्गत साठा पुरेसा असल्याने तातडीची चिंता नसल्याचे सरकारने स्पष्ट केले.

एलपीजी पुरवठ्याबाबतही सरकारने दिलासा दिला आहे. कोणत्याही वितरकाकडे एलपीजीची कमतरता नसून ऑनलाइन बुकिंग सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले. गेल्या 25 दिवसांत सुमारे 2.5 लाख नवीन PNG कनेक्शन देण्यात आले असून, सुमारे 2.20 लाख ग्राहकांनी एलपीजीवरून PNGकडे स्थलांतर केले आहे. तसेच, सुमारे 2.5 लाख नवीन अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली.

याशिवाय, देशातील 26 राज्यांना सुमारे 22,000 टन व्यावसायिक एलपीजीचे वाटप करण्यात आले आहे. पर्यायी इंधन म्हणून केंद्र सरकारने राज्यांना अतिरिक्त केरोसिनचा पुरवठाही केला असून 16 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारे संयुक्त कारवाई करत आहेत. याअंतर्गत विविध राज्यांत सुमारे 2700 छापे टाकण्यात आले असून जवळपास 2000 सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडणारा सुमारे 167 किमी लांबीचा जलमार्ग असून जगातील सुमारे 20 टक्के पेट्रोलियम वाहतूक याच मार्गाने होते. सध्याच्या युद्धपरिस्थितीमुळे या मार्गाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. घरगुती सिलिंडर बुकिंगसाठी लॉक-इन कालावधी 21 दिवसांवरून शहरांत 25 दिवस आणि ग्रामीण भागात 45 दिवस करण्यात आला आहे. तसेच PNG कनेक्शन असलेल्या ग्राहकांना LPG सिलिंडर ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.

एकूणच, देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून अफवांमुळे निर्माण झालेली घबराट टाळण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.


Protected Content

Play sound