
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील मुलांच्या बाल निरीक्षण गृहात संस्कार, मूल्ये आणि आनंद यांची सांगड घालणारा प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. सुधर्मा संस्थेच्या वतीने आयोजित या उपक्रमात बालसंस्कार गोष्टी, संवाद, खेळ आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. गेल्या पंधरा वर्षांपासून सुधर्मा संस्था सातत्याने हा उपक्रम राबवत असून, समाजातील वंचित व गरजू मुलांपर्यंत संस्कार पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे चित्र या कार्यक्रमातून दिसून आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून जळगाव आकाशवाणी केंद्राच्या उद्घोषिका अपूर्वा वाणी तसेच बाल निरीक्षण गृहाचे प्रमुख श्री. अहिरराव उपस्थित होते. सुधर्मा संस्थेच्या वतीने मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सुधर्मा संस्थेचे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. गरीब आणि गरजू मुलांसाठी शैक्षणिक तसेच संस्कारक्षम कार्यक्रमांचे आयोजन हेच संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना हेमंत बेलसरे यांनी स्वतःवर साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाचा खोल प्रभाव असल्याचे सांगितले. हे पुस्तक प्रत्येक मुलाने वाचावे, कारण त्यातून माणुसकी, संस्कार आणि जीवनमूल्ये शिकायला मिळतात, असे त्यांनी मुलांना आवर्जून सांगितले. त्यानंतर प्रमुख पाहुण्या अपूर्वा वाणी यांनी मुलांशी दिलखुलास गप्पा मारत संवाद साधला.
अपुर्वा वाणी यांनी मुलांना ससा आणि कासवाची एका नव्या पद्धतीची गोष्ट सांगितली. या कथेत ससा आणि कासव एकमेकांशी स्पर्धा न करता परस्पर सहकार्याने विजयी होतात, असा संदेश देण्यात आला. समाजात पुढे जाताना एकमेकांना मदत करून, एकत्र काम करत यश मिळवावे, असा मौलिक संदेश त्यांनी मुलांना दिला. या गोष्टीमुळे मुले विशेष आनंदी झाली असून त्यांनी गोष्टीतून शिकण्याचा अनुभव घेतला.
कार्यक्रमादरम्यान मुलांसोबत विविध खेळही खेळण्यात आले. या खेळांमध्ये सर्व मुले मनापासून सहभागी झाली आणि संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मुलांना तिळगुळ वाटप करण्यात आले, ज्यामुळे मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आपुलकी आणि गोडवा अधिकच वाढला.



