Home Cities यावल सुधाकर फेगडे यांचा ‘नेशन बिल्डर’ जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

सुधाकर फेगडे यांचा ‘नेशन बिल्डर’ जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

0
133

 यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागात राहून शैक्षणिक क्रांती घडवणाऱ्या व शंभराहून अधिक प्रशासकीय अधिकारी घडवणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधाकर आर. फेगडे यांचा ‘नेशन बिल्डर जीवनगौरव पुरस्कार’ देऊन नुकताच सन्मान करण्यात आला. त्यांच्या तपश्चर्येस पात्र असा हा पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे आयोजित एका प्रतिष्ठित समारंभात प्रदान करण्यात आला.

यावल तालुक्यातील सातोद गावचे रहिवासी असलेले सुधाकर फेगडे यांनी आपल्या शिक्षक म्हणून केलेल्या प्रदीर्घ सेवेतून अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उजळले आहे. ग्रामीण भागात सीमित साधनसंपत्तीमध्येही त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अपूर्व कामगिरी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध प्रशासकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळेच त्यांना “शंभरहून अधिक अधिकारी घडवणारा शिक्षक” अशी उपाधी बहाल करण्यात येते.

‘रोटरी क्लब ऑफ सटाणा बालगण’ (जिल्हा नाशिक) यांच्या वतीने सुधाकर फेगडे यांना सपत्नीक ‘नेशन बिल्डर गौरव जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम सटाणा येथील पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीप बोरसे होते. यावेळी बालगणचे तहसीलदार कैलास तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सुधाकर फेगडे यांचा सन्मान करण्यासाठी आलेले मान्यवर. या पुरस्कार वितरण सोहळ्यास दिलीप दळवी, डॉ. प्रशांत सोनवणे, सौ. शालनाताई सोनवणे, अरुण पवार आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली. प्रत्येक वक्त्याने फेगडे सरांच्या कार्याची प्रशंसा करत, त्यांच्या शिक्षकधर्माच्या निष्ठेला सलाम केला.

या सन्मानानंतर सुधाकर फेगडे यांचे त्यांचे चिरंजीव आणि यावलचे माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, तसेच समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी स्वागत केले. सोशल मीडियावरही त्यांच्या सन्मानाच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत. त्यांच्या यशाचा गौरव करताना संपूर्ण यावल तालुका, तसेच शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.


Protected Content

Play sound