तरूणांचे अचानक होणारे मृत्यू कोरोना लशीमुळे नाही : आरोग्यमंत्री नड्डा

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोरोना काळानंतर तरुणांच्या अचनाक होणाऱ्या मृत्युंची संख्या वाढली आहे. या प्रकारानंतर कोरोना लशीमुळे तरुणांचे अचानक होणारे मृत्यू वाढल्याची सर्वत्र चर्चा होती. तसेच करोना लशीच्या दुष्परिणामांबाबतही अनेक उलट सुलट चर्चा होत असते. अशात केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी नुकतेच राज्यसभेत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी देशात होणाऱ्या तरुणांच्या अचानक मृत्यूंमागे कोरोना लस नसल्याचे सांगितले.

राज्यसभेत बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा म्हणाले की, “आयसीएमआरच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की करोना लशीमुळे अचानक होणाऱ्या मृत्यूची शक्यता कमी होते. ICMR च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजीने १८ ते ४५ वयोगटातील लोकांवर एक अभ्यास केला. यामध्ये अशा लोकांचा समावेश करण्यात आला ज्यांचा १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान मृत्यू झाला होता. या संशोधनासाठी देशातील १९ राज्यांतील ४७ रुग्णालयांमधून नमुने घेण्यात आले होते. यातील २९१६ नमुने हृदयविकाराच्या झटक्यानंतर वाचलेल्या लोकांचे होते. तर ७२९ नमुने अचानक मृत्यू झालेल्यांचे होते. या संशोधनानंतर असे सांगण्यात आले की, करोना लशीचा किमान एक किंवा दोन डोस घेतल्यानंतर अचानक मृत्यूची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.

Protected Content