यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत तालुक्यात राबविण्यात आले.
तालुक्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात आले.
तालुका पातळीवर उपक्रमाच्या निकषाप्रमाणे शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये सहभागी झालेल्या सर्व सहभागी शाळांचे अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन १ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले होते. त्यानुसार नियोजित वेळापत्रकानुसार सुरुवातीला प्राथमिक स्तर व त्यानंतर तालुका स्तरावर मुल्यांकन करण्यात आले.यात माध्यमिकमध्ये अ.ध.चौधरी विद्यालय व जुनिअर कॉलेज डोंगर कठोरा प्रथम,भारत विद्यालय न्हावी व्दितीय तर डी एच जैन विद्यालय कोरपावली तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
या अभियानाच्या अंतर्गत, शासकीयमध्ये जि.प.शाळा डांभुर्णी प्रथम,जि.प.शाळा,शिरसाड व्दितीय तर जि.प.शाळा,दहीगांव या शाळेने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.यामुळे प्रथम क्रमांक तीन लाख,द्वितीय क्रमांक दोन लाख व तृतीय क्रमांक एक लाख रुपये पारितोषीकांचे मानकरी ठरले आहेत.
या अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणार्या शाळांना विविध उपक्रमांस संदर्भात गुणांकन देण्यात आले होते.यात विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यामध्ये शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण,शाळेची इमारत,संरक्षित भिंती,वर्ग बोलक्या भिंतींची उभारणी,विद्यार्थी मंत्रीमंडळ, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, परसबाग व अमृतवाटिका यांची निर्मिती,मेरी माटी मेरा देश उपक्रम, शाळेची विद्यार्थ्यांनी चालवलेली बचत बँक,नवभारत साक्षरता अभियान,विद्यार्थ्यांचा शाळेतील उपस्थितीचे प्रमाण,महावाचन चळवळ,शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन,स्वच्छता मॉनिटर अभियान,राष्ट्रीय एकात्मता संदर्भात विविध उपक्रम,विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन आदींचा समावेश होता. तसेच याच्या सोबतीला व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग यामध्ये विद्यार्थी आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन,आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन,दानशूर व्यक्ती,संस्था यांच्याकडून मिळालेले वस्तू व सेवा स्वरूपातील देणगी,शाळा व्यवस्थापन समितीने पार पडलेले प्रभावी कामकाज,तंबाखू मुक्त व प्लास्टिक मुक्त शाळा तसेच माजी विद्यार्थी,पालक,सेवाभावी संस्था यांचा अधिकाधिक सहभाग व योगदान अशा विविध मुद्द्यांवर निकषानुसार गुणांकन करून विजयी स्पर्धकांची निवड करण्यात आली.
सुरुवातीला तालुक्यातील १२ केंद्रातील खाजगी व्यवस्थापनातील १२ व शासकीय मधील १२ अशा २४ शाळांची निवड केंद्रस्तरीय मूल्यांकन समितीने केली होती,त्यानंतर तालुकास्तरीय मुल्यांकन समिती अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड, गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी निकषानुसार बारकाईने निरीक्षण करून यातील खाजगी व्यवस्थापनातील ३ व शासकीय मधील ३ असे एकुण ६ शाळांची निवड करण्यात आली.यातील दोन्ही गटातील प्रथम आलेल्या डोंगर कठोरा येथील अ.ध. चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज व डांभुर्णी येथील जि.प.प्राथ.शाळा यांची जिल्हास्तरीय मूल्यांकन समिती अधिकारी जितेंद्र विसपुते,प्रतिमा सानप, एस. एम. पाटील,महेश वाणी यांनी तपासणी केली.
यावल तालुक्यातील निवड झालेल्या शाळांच्या यशांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती,मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मार्गदर्शन करणारे तज्ञ व्यक्ती,ग्रामस्थ,माजी विद्यार्थी यांचा सहभाग आहे.यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित कुमार,माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.किरण कुंवर,प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील,सर्व उपशिक्षणाधिकारी,शिक्षण विस्तार अधिकारी,सर्व मूल्यांकन समिती अधिकारी तसेच तालुक्याच्या गट विकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड,गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके,गट समन्वयक तथा केंद्रप्रमुख महंमद तडवी,विजय ठाकूर,प्रमोद सोनार,कविता गोहिल, मुक्तार शेख तसेच इतर सर्व मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन लाभले.