जळगाव प्रतिनिधी । येथील उज्ज्वल स्प्राऊटर इंटरनॅशनल स्कुलमध्ये गेल्या दीड वर्षापासून ‘जीवन अर्थशास्त्र’ (लाईफ इकॉनॉमिक्स) हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाचे यंदा यशस्वी झाल्याचे परिणाम दिसू लागले आहेत. हा उपक्रम राबविणारी राज्याची ही पहिलीच शाळा आहे. या उपक्रमाबद्दल पालकांनी देखील नुकत्याच पार पडलेल्या स्नेहसंमेलनात पसंतीची पावती देत शाळेचे अभिनंदन केले.
गेल्या दिड वर्षापासून शाळेत जीवन अर्थशास्त्र (लाईफ इकॉनॉमिक्स) हा विषय शिकवला जातो. या अंतर्गत यौवनात पदार्पण करतांना, बेन जीमिंग, फॅशनची योग्य योग्यता आणि त्याचे आजच्या बदलत्या युगातील महत्व, योग्य कार्यक्रमानुसार कपड्यांचे भान ठेवणे (ड्रेसिंग सेन्स), मेकअप, समोर असणा-या व्यक्तीनुसार आवाजातील चढउतार (व्हाईस मोड्युलेशन/ इंटोनेशन), शरीराची परिभाषा (न्युरो लीन्वीस्टिक प्रोग्रामिंग), ग्राफोलॉजी (अक्षरी विद्या), कलर थेरपी अश्या विविध अंगानी युक्त विषय शिकवले जातात. पण त्याचबरोबर शिवणकला, पाककला यासारख्या परिचित पण आज शाळेत दर्लक्षित असलेल्या विषयांना देखील हात घातला जात असल्याने विद्यार्थ्यांनी त्याचा सहज स्वीकार केला. त्यामुळे काही विद्यार्थी उजवा आणि डावा मेंदू या दोघांचा परिणाम कारक वापर करू लागले. त्यामुळे काही विद्यार्थी दोघ हातांनी लिहू लागल्याचे दिसून आले. यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बळावला असून त्यातून अभ्यासात सातत्याने ३०% वा त्याहून कमी गुण मिळवणारे विद्यार्थी आता सहजपणे ६०% वा अधिक गुण मिळवत असल्याचे शाळेला दिसून आले. त्याचबरोबर हे विद्यार्थी आत्मविश्वासाने विविध व्यक्तीशी बोलतात, त्यांचाबरोबर मिसळताना सहजतेने वावरताना दिसतात. विद्यार्थ्यातील झालेला सकारात्मक बदल. त्यांचा वाढलेला आत्मविश्वास, शैक्षणिक प्रगतीत झालेले आश्चर्यकारक बदल पाहून या विषयाच्या कक्षा सातत्याने रुंदावत नेण्यात आल्या.
शाळेच्या प्राचार्य मानसी भदादे यांनी हा विषय शाळेत सुरु करण्याची कल्पना मांडत संस्थेला परवानगी मगितली होती. व ती यशस्वी करून दाखविली. गेले दीड वर्ष प्राचार्य मानसी भदादे या हे विषय विद्यार्थ्यांना शिकवत असून शाळेने शिक्षण क्षेत्रातील एक वेगळे टाकलेले यशस्वी पाउल आहे. नुकत्याच झालेल्या स्नेहसंमेलनात या जीवन अर्थशास्त्राची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना पालकांसमोर सादर केली. पालकांनी देखील आपल्या पाल्यात झालेल्या बदलाबाबत समाधान व्यक्त करत हा उपक्रम शाळेने राबविल्या बद्दल शाळेचे अभिनंदन केले.
यामागची भूमिका विषद करताना मानसी भदादे यांनी सांगितले की, पुस्तकी ज्ञानाच्या प्रत्यक्ष जीवनात मर्यादित उपयोग होतो. हे अत्यंत वास्तव असे सत्य आहे. दुर्दैवाने जीवनात जे खूप महत्वाचे आहे. त्याच सगळ्या गोष्टींकडे शालेय व महाविद्यालयीन जीवनातही लक्ष दिले जात नाही. परिणामतः येणारे नैराश्य, निष्क्रियता, अबोलपणा इ. मुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांना समाजास सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी शाळांकडून जीवन अर्थशास्त्राच्या रूपाने आत्मविश्वास, बहुविधता, भविष्याला सामोरे जातानाची विविधांगी शिदोरी देण्याचा हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे. संस्थेच्या अध्यक्षा अनघा गगडाणी यांनी या उपक्रमाची दाखल घेत प्राचार्य व त्यांचे सहकारी यांचे कौतुक केले असून याचा आहवाल आपण आता राज्याच्या शिक्षणमंत्राकडे पाठवणार असल्याचे सांगितले आहे.