मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या

बीड । मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील केतुरा येथील विवेक कल्याण रहाडे या १८ वर्षाच्या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

केतुरा येथील विवेक कल्याण रहाडे (१८) या विद्यार्थ्याने गळफास घेतला. बारावीला चांगले गुण मिळाल्यानंतर त्याने नीटची परीक्षा दिली होती. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

त्याने बुधवारी शेतातील झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवेकवर दुपारी साडेचार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. घरात एक चिठ्ठी आढळून आली आहे. मी एक कष्टकरी आणि गरीब शेतकर्‍याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. मराठा आरक्षण गेल्यामुळे माझा वैद्यकीयला नंबर लागणार नाही. खासगी महाविद्यालयांत वैद्यकीय शिक्षण घेण्याची माझी ऐपत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी केंद्रआणि राज्य सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि तेव्हा माझे मरण सार्थक होईल, अशी चिठ्ठी विवेकने लिहिली आहे.

Protected Content