जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । स्पर्धेच्या युगात मागे राहू नये, म्हणून विद्यार्थांनी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग नोंदवून आपली गुणवत्ता सिद्ध करावी असे आवाहन जळगाव उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक प्रा.डॉ.संतोष चव्हाण यांनी व्यक्त केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे नेट, सेट आणि पेट परीक्षेच्या पहिल्या पेपर करिता आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन दि. १६ मार्च रोजी जळगाव उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक प्रा.डॉ.संतोष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. अनिल चिकाटे आणि कार्यशाळेचे मुख्यसंयोजक विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर भटकर उपस्थित होते.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.संतोष चव्हाण पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थांनी यशस्वी व चांगल्या जीवनमानासाठी स्पर्धा परीक्षेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला पाहिजे. तसेच तन- मनाने प्रयत्न केले पाहिजे तरच ते परीक्षेसोबतच जीवनातही यशस्वी होतील.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ.अनिल चिकाटे म्हणाले, व्यक्तिमत्त्व विकासात स्पर्धा परीक्षांचे विशेष महत्व आहे. नेट सेट आणि पेट या तिन्ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या आकलनाचा स्तर तपासणाऱ्या आहेत. त्यामुळे विद्यार्थांनी आकलनाचा स्तर, वाचन क्षमता आणि अभ्यासातील सातत्य वाढविणे गरजेचे आहे.
कार्यशाळेचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर भटकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनोद निताळे तर आभार डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी मानले.
कार्यशाळेत पहिल्या दिवशी प्रथम सत्रात प्रा.डॉ. कमलाकर पायस (तक्षशिला महाविद्यालय अमरावती) यांनी सामान्य ज्ञान, बौद्धिक आणि गणितीय व तार्किक क्षमता या विषयावर तर दुपारच्या सत्रात प्रा.डॉ राजेश बोबडे (शामप्रसाद मुखर्जी महाविद्यालय शेंदूरजनाघाट, वरूड, जि.अमरावती) यांनी अध्ययन- अध्यापन, संशोधन आणि तंत्रज्ञान याविषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. दोन्ही सत्राचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ गोपी सोरडे यांनी केले. या कार्यशाळेत महाराष्ट्रातून जवळपास ७०० विद्यार्थी विभागाच्या युट्यूब चॅनल द्वारे सहभागी झाले आहेत.
कार्यशाळेत उद्या दि. १७ मार्च रोजी प्रथम सत्रात प्रा.पल्लवी इंगोले (वसंतराव नाईक महाविद्यालय, धारणी, जि.अमरावती) तर दुपारच्या सत्रात प्रा.डॉ. रविंद्र पाटील (या. द. व. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तिवसा, जि.अमरावती) हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेचा समारोप दुपारी 4 वाजता विद्यापीठातील यु.आय.सी.टी. चे संचालक तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डॉ.जितेंद्र नाईक यांच्या हस्ते होणार आहे.