चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील टाकळी प्र दे येथील अश्वमेघ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘जल है तो कल है’ चा नारा देत शहरात प्रमुख ठिकाणे व चौकांमध्ये पथनाट्याद्वारे जनतेला पाण्याचे महत्त्व पटवून दिले व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावण्याचे आवाहन केले.
यावेळी अश्वमेध पब्लिक स्कूल व अनन्या फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. अश्विनी सुभाष पाटील यांनी सांगितले की, आपण म्हणतो पाऊस येत नाही दुष्काळ आहे. परंतु पाऊस पडण्यासाठी आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे. आपण नळाला आलेले पाणी भरपुर भांड्यांमध्ये भरून ठेवतो व पुन्हा मिळाल्यावर शिल्लक असलेले पाणी फेकून देतो परंतु तसे न करता ते पाणी वापरात घेतले पाहिजे कारण पाणी शिळे होत नाही ज्या वेळेस पाणी मिळत नाही, त्यावेळेस फेकलेल्या पाण्याची किंमत आपल्याला जाणवते. उद्या (४ जुलै) अश्वमेध पब्लिक स्कूल येथे सकाळी १०.०० वाजता पालकांना व परिसरातील नागरिकांना २५०० रोपे भेट देऊन सर्व पालकांना आवाहन केले जाणार की, ‘तुमची मुले आम्ही वाढवतो आमची मुले तुम्ही वाढवा’ या दृष्टिकोनातून त्यांना रोपांची भेट दिली जाणार आहेत. यावेळी सौ.प्रतिभा चव्हाण, सौ. कावेरी पाटील, सौ. रणदिवे, पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल, शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ अश्विनी पाटील यांनी सगळ्यांचे आभार मानले.