अमळनेर, गजानन पाटील | येथील प्रताप कॉलेजच्या आवारात आज विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने तणावाचे वातावरण पसरले. टि.वाय.बी.एस्सी.च्या ७० विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊनही त्यांना गैरहजर दाखविण्यात आल्याचे प्रकरण यातून ऐरणीवर आले आहे. विद्यार्थ्यांची आज समजूत घालून त्यांना आश्वस्त करण्यात आले असले तरी यावर निर्णय न झाल्यास हे प्रकरण अजून चिघळण्याची शक्यता आहे.
याबाबत वृत्त असे की, येथील प्रताप महाविद्यालयातील टीवायबीएससी वर्गातील ७० विद्यार्थी नापास झाले आहेत. या सर्वांनी परीक्षा दिली असूनही त्यांना अनुपस्थित दाखवून नापास करण्यात आले आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊनही यावर काहीही निर्णय झालेला नाही. या अनुषंगाने हा प्रश्न निकाली न निघाल्यास १२ ऑगस्टला, महाविद्यालयासमोर विद्यार्थी आत्मदहन करतील, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने प्राचार्यांना निवेदनाद्वारे दिला होता.
या निवेदनावर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे सचिव भूषण भदाणे, श्रीनाथ पाटील, सुनील शिंपी, अनिरुद्ध शिसोदे यांच्या स्वाक्षर्या होत्या.
दरम्यान, हे निवेदन देऊनही यावर काहीही निर्णय न झाल्यामुळे आज सकाळी राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसह कॉलेजच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने कुणालाही इजा झाली नाही. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून कॉलेज व्यवस्थापनाचा निषेध केला. तर व्यवस्थापनाने या प्रकरणी विद्यापीठाने तीन-चार दिवसात निर्णय घेण्याचे कळविले असल्याने यावर कार्यवाही होईल असे आश्वस्त केले. तसेच विद्यार्थ्यांना कुणी प्राध्यापक अपशब्द बोलला असेल तर त्याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, या आंदोलनामुळे प्रताप कॉलेजच्या परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
खालील व्हिडीओत पहा प्रतापच्या आवारातील आंदोलनाचा थरार….
युट्युब व्हिडीओ लिंक
फेसबुक व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/522509062314819