जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे पगार रखडल्याने संतप्त कामगारांनी बुधवारी 22 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजेपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान जोपर्यंत पगार होत नाही, तोपर्यंत काम सुरू करणार नाही, असा देखील पवित्रा त्यांनी घेतला आहे.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे ठेकेदारी पद्धतीतून कामगारांची भरती करून विविध विभागात कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहे. हे कर्मचारी सुरुवातीला २०१६ पासून एसएमएस कंपनीच्या माध्यमातून नियमितपणे कर्मचारी वेगवेगळ्या विभागात काम करत आहे. त्यानंतर डिसेंबर २०२४ नंतर एसएमएस सोबत स्मार्ट सर्विस या खाजगी कंपनीच्या अंतर्गत यातील काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामाला सुरूवात केली. स्मार्ट सर्विस अंतर्गत एकूण ८० ते ९० कर्मचारी काम करत आहे. दोन वेगवेगळ्या ठेकेदारीच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काम सुरू असताना स्मार्ट सर्विस कंपनीने कंत्राटनंतर पहिल्याच महिन्यात कर्मचाऱ्यांचा पगार रखडला, त्यामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान गेल्या मंगळवारी २१ जानेवारीपर्यंत डिसेंबर महिन्याचा पगार दिला जाईल असे आश्वासन कंपनीचे मॅनेजर कुणाल जैन आणि सुपरवायझर रवी पाटील यांनी दिले होते. परंतु सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार पडला नसल्याने बुधवारी २२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेपासून संतप्त झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करून पगार होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरू केले.