भुसावळ प्रतिनिधी । देशभरातील आयुध निर्माणीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचार्यांनी संपाचे हत्यार उगारले असून यात भुसावळ आणि वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरीजमधील कर्मचारी सहभागी झाले अहेत.
केंद्र सरकारने आयुध निर्माणीतील संरक्षण उत्पादनांना नॉन कोअर करुन आता देशभरातील ४१ आयुध निर्माणींच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. या निर्णयाविरोधात आयुध निर्माणीतील एआयडीईएफ, आयएनडीडब्लूएफ, बीपीएमएस व स्टॉप संघटनेच्या सीडीआरए यांच्यातर्फे २० ऑगस्ट पासून तब्बल महिनाभराचा संप पुकारण्यात आला आहे. या संपात भुसावळ आणि वरणगाव आयुध निर्माणीतल्या कर्मचार्यांनी सहभाग नोंदवला आहे. सर्व युनियनच्या संयुक्त संघर्ष समितीद्वारे संप यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते पहाटे चार वाजेपासून निर्माणी परिसरातील मुख्य दरवाजाजवळ उपस्थित होते. दिवसभर भुसावळ आणि वरणगावात कामकाज बंद असल्याने सव्वा कोटी रुपये मुल्याचे संरक्षण उत्पादन ठप्प झाले. हा संप महिनाभर चालल्यास दोन्ही आयुध निर्माणींतून सुमारे ३८ कोटी रुपयांचे उत्पादन ठप्प होण्याची शक्यता आहे. दरम्यान संपाच्या पार्श्वभूमीवर आता बुधवारी (दि. २१) दिल्लीत संरक्षण सचिव अजय कुमार यांनी तिन्ही फेडरेशन व सीडीआरएची बैठक बोलवली आहे. या बैठकीतील निर्णयानंतर संपाबाबत पुढील भूमिका घेतली जाणार असल्याची माहिती कामगार संघटनांतर्फे देण्यात आलेली आहे.
आयुध निर्माणी भुसावळात कामगार युनियन, इंटक युनियन, बीपीएमएस, बीएसकेएस, एससी-एसटी-ओबीसी मायनॉरिटी असोसिएशन, क्लरिकल असोसिएशन, सुपरवायझर असोसिएशन, एनजीओ असोसिएशनने संपात सहभाग घेतला.