जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील एका गावामध्ये दलित समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली असून असे कृत्य करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. या मागणीचे लेखी निवेदन जामनेर चर्मकार समाजातर्फे तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले.
शनिवार, दि.१४ मे रोजी गावातील काही नराधमांनी पाचोरा तालुक्यातील एका गावामध्ये राहणाऱ्या १२ वर्षाच्या दलित अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अमानुषपणे सामुहिक लैगिक अत्याचार केला. त्यानंतर दि. १५ रोजी पहाटे सुमारे ३ वाजेच्या दरम्यान तिला गावाबाहेरील सार्वजनिक महिला शौचालयाजवळ आणून सोडून दिले.
मुलगी तिच्या घरी आल्यानंतर सदरील घटनेचा प्रकार उघडकीस आला. ही घटना अतिशय अमानुष, निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी व अत्यंत दुर्दैवी आहे. स्थानिक पोलीसांनी काही आरोपींना जरी अटक केलेली असली तरी पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा देणारी ही दुर्दैवी घटना आहे.
या घटनेचा निवेदनाद्वारे समस्त चर्मकार समाज बांधव जामनेर तालुक्याच्या वतीने तीव्र जाहीर निषेध नोंदवून गुन्हयाशी संबंधित इतर सर्व आरोपींना त्वरीत अटक होवून सदर खटला फास्ट ट्रैक कोर्टात चालविण्यात यावा. व याकामी अँड उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येवून पिडीतेस लवकरात लवकर न्याय मिळावा. याशिवाय पिडीत व तिच्या कुटुंबीयांना योग्य ती शासकीय मदत त्वरीत मिळावी.”
या आशयाचे निवेदन समाज बांधवांच्या वतीने जामनेर तहीलदार श्री अरुण शेवाळे यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघ जामनेरचे तालुकाध्यक्ष डॉ.जितेंद्र वानखेडे, दिपक तायडे, अशोक भारुडे, दीपक सुरडकर, डी.बी.मोरे, डी.बी.वानखेडे, विनायक सुरडकर, खंडू काकडे, सूवानंद सुरडकर, सुहास वाडे, साहेबराव पद्मे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.