यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील शहराच्या सार्वजनिक ठिकाणी आणि नव्याने विस्तारलेल्या वसाहतींमध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहान शाळकरी मुलांना चावा घेणे, दुचाकीस्वारांच्या मागे धावणे आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले करणे, असे प्रकार नित्याचे झाले असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गंभीर समस्येकडे यावल नगर परिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

शहरातील फालक नगर, पांडुरंग सराफ नगर, तिरुपती नगर, आयशा नगर आणि प्रभुलिला नगर यांसारख्या विस्तारित भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. १० ते १५ कुत्र्यांच्या झुंडी रस्त्यावरून फिरत असतात. शाळेत जाणारी लहान मुले, पायी चालणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर धावून जात त्यांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. इतकेच नव्हे, तर दुचाकी वाहनांचा पाठलाग केल्याने अनेकदा अपघात होता होता वाचले आहेत. या कुत्र्यांच्या टोळक्यांकडून शेळ्यांवर हल्ले करून त्यांना ठार मारण्याचे प्रकारही घडले आहेत, ज्यामुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

या गंभीर समस्येबाबत नागरिकांनी अनेक वेळा नगर परिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमधील असंतोष वाढत आहे. “या निर्लज्ज प्रशासनाला नागरिकांच्या जिवाची काहीच किंमत नाही का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा या सर्व कुत्र्यांना पकडून थेट नगर परिषदेच्या कार्यालयात सोडण्याचा संतप्त इशाराही नागरिकांनी दिला आहे. या समस्येवर त्वरित तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्याचा पवित्राही नागरिकांनी घेतला आहे.



