आश्चर्यकारक : दोनदा मृत घोषित महिला निघाली जिवंत

dead ..........

चंडीगड, प्रतिनिधी | एखाद्या नव्हे तर चक्क दोन रुग्णालयांनी दोन वेळा मृत घोषित केलेली एक महिला खरे तर जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्याने चंडीगडमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, आजारी असलेली ही महिला तिसऱ्यांदा मृत घोषित करण्यात आली. त्यानंतर तिच्या मृतदेहावर अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले. देशात अशा प्रकारचे हे पहिलेच उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.

 

या ४५ वर्षीय महिलेला एका रुग्णालयाने मृत घोषित केल्यानंतर तिला चंडीगडमधील शासकीय रुग्णालयात (जीएमसीएच-३२) आणण्यात आले. तिथे तपासणी केल्यानंतर तिचे हृदय सुरू असल्याचे आढळले. त्या महिलेचे ईसीजी देखील व्यवस्थित येत होते. शिवाय तिच्या शरीरातील अवयव देखील काम करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर या शासकीय रुग्णालयात या मृत महिलेवर दोन तास उपचारही करण्यात आले. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.

हे प्रकरण या शासकीय रुग्णालयाच्या एका कॉन्फरन्समध्ये सादरही करण्यात आले. या परिषदेत सादर केलेल्या माहितीनुसार, या महिलेला शासकीय मल्टिप्लिसीटी हॉस्पिटलने (जीएमएसएच-१६) मृत घोषित केले. मात्र, त्यानंतर तीन तासांनी महिलेचे मृतदेह गुंडाळून शववाहिनीत ठेवल्यानंतर तिच्या नातेवाईकांना तिच्या शरीरात काही हालचाली होत असल्याचे आढळून आले.

यानंतर या महिलेला जीएमसीएच-३२ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पुन्हा दोन तासांनी ती मृत झाल्याचे तेथेही घोषित करण्यात आले. हा मृत झाल्यानंतर पुन्हा जिवंत होण्याचा प्रकार असून जगात अशा प्रकारचे ३८ दाखले उपलब्ध असल्याचे डॉ. दासरी हरीश यांनी सांगितले. हरीश हे जीएमसीएच-३२ चे फॉरेन्सिक मेडिसीन विभागाचे प्रमुख आहेत. भारतातील अशा प्रकारचे हे पहिलेच उदाहरण असल्याचेही डॉ. हरीश सांगतात.

तथापि, या घडलेल्या घटनेची संपूर्ण चौकशी करण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. रुग्णालयांकडून महिलेला मृत घोषित करताना काही चुका झाल्या का, तिला योग्य उपचार मिळाले की नाहीत, वैद्यकीय उपचाराबाबतचे सर्व संकेत पाळले गेले किंवा नाही, तिला चुकीचे मृत घोषित केले गेले का, अशा सर्व पैलूंचा ही समिती तपास करणार आहे.

Protected Content