
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यात सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून, परिपक्व अवस्थेतील पिके आडवी पडल्याने शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये नुकसानाचे गंभीर चित्र समोर आले आहे.

तालुक्यातील लोन, मांडळ, चिमनपुरी, पिंपळे खुर्द या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर निम, पाडळसरे, कळमसरे, बोहरे आणि मारवड भागातही वादळासह पावसाने हजेरी लावत परिपक्व मका, बाजरी आणि ज्वारी पिके अक्षरशः आडवी पडली आहेत. या अचानक बदललेल्या हवामानामुळे काढणीच्या टप्प्यावर असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
चिमनपुरी, पिंपळे खुर्द, पिंपळे बु., अटाळे, शिरसाळे, आर्डी, अनोरे आणि जवखेडा या भागांमध्येही वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला. मका पिकांचे बुंधे तुटून पडले असून, ज्वारी आणि बाजरीचे कणसे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने उरलेली पिकेही धोक्यात आली आहेत.
दरम्यान, अमळनेर शहरातही या वादळी पावसाचा परिणाम जाणवला. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज तारा तुटून पडल्याच्या घटना घडल्या असून, महावितरणकडून वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना काही काळ अंधाराचा सामना करावा लागला.
या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून, आधीच अस्थिर बाजारभाव आणि उत्पादन खर्चामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही आपत्ती मोठा धक्का ठरली आहे. काढणीच्या उंबरठ्यावर असलेले पीक हातातून निसटल्याने आर्थिक नुकसान अधिकच वाढले आहे.
शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली असून, प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत नुकसानाचा सविस्तर अहवाल तयार होण्याची शक्यता आहे.



