नवी दिल्ली वृत्तसंस्था । जामिया आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायायलयात वकील इंदिला जयसिंग यांनी देशात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयात तात्काळ सुनावणीची मागणी केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणी करू असे म्हटले पण त्याआधी हिंसाचार थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. देशभरात मानवाधिकारांचे हनन होत असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले. पोलिसांकडून हिंसाचार करण्यात आला. याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांनी यावेळी मांडला. आम्ही शांततेत होणाऱ्या आंदोलनाच्या विरोधात नाही आणि नागरिकांना असणाऱ्या अधिकारांचे संरक्षण ही आमची जबाबदारी असल्याचे सुप्रीम कोर्टाने यावेळी स्पष्ट केले.
सुप्रीम कोर्टाने दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत हे कोर्ट रुम आहे. इथं शांततेत आपली बाजू मांडावी लागेल. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी होईल. मात्र, त्याआधी हिंसाचार थांबला पाहिजे अशी ताकीद ही कोर्टाने दिली. विद्यार्थी आपल्या हातात कायदा घेऊ शकत नसल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले. जर, तुम्ही ( विद्यार्थी) आमच्याकडे न्यायासाठी आला आहात तर तुम्हाला शांततेत आपलं म्हणंण मांडावं लागणार. जर तुम्हाला कायम आंदोलनच करायचे असेल तर तेच करावे. आम्ही अधिकारांच्या संरक्षणासाठी कटीबद्ध आहोत. मात्र, हे संघर्षाच्या वातावरणात होऊ शकत नाही. त्यामुळे सर्वात आधी हिंसाचार थांबवा, त्यानंतरच सुनावणी घेऊ अशी समज सुप्रीम कोर्टाने विद्यार्थ्यांना दिली.