जळगाव प्रतिनिधी । पारोळा ते मुकटी धुळे रस्त्यावर जळगाव आगाराच्या दोन बसेसवर दगडफेक झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेत बसचा समोरील काच फुटून चालक गंभीर जखमी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बस क्रमांक (एमएच 20 BL 4097) ही जळगाव ते धुळे या मार्गावर विच खेडा या गावाजवळ धावत असताना मोटर सायकल क्रमांक 0785 वरील दोन व्यक्तींपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने सदर बसवर दगडफेक फेकून मारला. या दगडफेकीत बसचा समोरील काच फुटून चालक संजय गोविंद रंधे (चालक क्रमांक 2880) यांना दुखापत झालेली आहे.
त्याचप्रमाणे काही वेळातच याच ठिकाणी जळगाव आगाराची दुसरी बस क्रमांक एम एच 20 3381 या धुळे येथून जळगाव जाणाऱ्या बसवर दुपारी 12:45 च्या सुमारास याच मोटर सायकल स्वार व्यक्तींनी दगडफेक केली. या दगडफेकीत बसचा काच फुटला आहे. बस चालक सोपान सपकाळे (क्रमांक 1358) यांनी प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला.
यासंदर्भात पारोळा पोलीस स्टेशन मध्ये संशयित मोटर सायकल स्वार विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूराव पाटील करीत आहेत.