जळगाव प्रतिनिधी । येथील मेहरूण परिसरातील छत्रपती शिवाजी उद्यान भागामध्ये कंजरभाट समाजाच्या स्मशानभूमीमध्ये आज दुपारी दोन गटात वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यात कोणीही जखमी झाल्याची माहिती नसून गुजरात येथील कारच्या मागील बाजूच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. याप्रकरणी सहा जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील अंधशाळेजवळील संजय गांधी नगर कंजरवाडा येथील माहेर असलेले आणि गुजरात राज्यातील दाऊद गोध्रा येथील सासर असलेली विवाहिता दीपा विजय गुमाने हिला आजारी असल्यामुळे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात उपचारासाठी २६ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. उपचाराअंती २७ रोजी विवाहितेचे निधन झाले. शनिवारी तिचा अंत्यसंस्कार करण्यात आला होता. दरम्यान रविवारी २९ रोजी राख सावरण्याच्या विधीसाठी दुपारी २ वाजेच्या सुमारास माहेर व सासरची मंडळी छत्रपती शिवाजी उद्यानातील कंजरभाट समाजातील स्मशानभूमीत एकत्र जमलेली होती. यावेळी सासरच्या मंडळींकडून मिळालेल्या माहितीवरून मयत दीपा गुमाने यांच्या बहिणीने दीपा यांचे पती विजय गुमाने यास कुठल्यातरी कारणावरून स्मशान भूमीतच दगड मारून फेकला. या कारणावरून सासर व माहेरच्या मंडळीत शाब्दिक वाद झाले.
यात आनंद सुनील मlचरे याने सासरच्या मंडळींची गुजरातच्या कारची (क्रमांक- जी.जे. २०. एन. १४२१) मागील बाजूची काच पूर्ण फोडली. यावरून हाणामारी होऊन दगडफेक झाली, असेही त्यांचे म्हणणे आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबंधितांना दोन कारसह ताब्यात घेत इच्छादेवी पोलीस चौकीत आणले असता तेथेही दोन्ही कुटुंबात पोलीस चौकीत वाद झाला. यावेळी इच्छादेवी पोलीस चौकीत कंजर समाजाचा मोठा जमाव जमला. काही वेळ तणावाचे वातावरण होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. तेथे प्राथमिक चौकशी करून पोलिसांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला नेले. तेथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरूं होती. यावेळी काच फोडलेल्या कारसह (क्रमांक- जी.जे. २०. ए. एच. ६२६६) हि देखील ताब्यात घेण्यात आली आहे.
पो.कॉ. चेतन सोनवणे यांच्या फिर्यादीवरून संदीप दिलीपकुमार भाट वय-२५, नवीन शंकर गुमाणे वय-४०, योगेश कुमार महेशभाई गुमाणे वय-२५ सर्व रा. दाहोद, मिशन हॉस्पिटलमागे, गुजरात, आनंद सुनिल माचरे , प्रल्हाद सुनिल माचरे, संतोष मनोज माचरे सर्व रा. जाखनी, कंजरवाडा जळगाव यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत दीपा गुमाने यांच्या माहेरच्या मंडळींचे म्हणणे आहे की, सासरचे मंडळीं मयत दीपाला नाहक त्रास देत होते. तसेच तिच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्याने तिचा मृत्यू झाला. दीपाच्या मृत्यू नंतरचे विधी सासरी करण्याबाबत झालेल्या वादामुळे हा प्रकार घडल्याचे माहेरच्या लोकांचे म्हणणे आहे.