जळगाव प्रतिनिधी । धुळे येथून बारदार घेवून जळगावात खाली करण्यासाठी आलेल्या ट्रकचे टायर फुटल्याने निघालेल्या ठिणगीमुळे चालत्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना आज रात्री ९ वाजेच्या सुमारास शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलावर घडली. महापालिकेच्या दोन अग्निशमन बंबाने ही आग आटोक्यात आणली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धुळे येथून ट्रक क्रमांक (एमएच ०४ सीजी ७८१२ ) कृषि उत्पन्न बाजार समितीत लागणारे बारदान घेवून जळगाव शहरात आज रात्री ९ वाजेच्या सुमारास दाखल झाला. शिवकॉलनी जवळील रेल्वे उड्डान पुलावरून जात असतांना चालत्या ट्रकचे अचानक टायर फुटले. टिणगी उडाल्याने ट्रक मधील बारदानला आग लागली. ट्रकला आग लागल्याचे समजताच ट्रक चालकाने रस्त्यावरच ट्रक थांबविला. यावेळी रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांनी देखील आपापली वाहने थांबवून आग आटोक्यात आण्यासाठी ट्रक मधील बारदान काढण्याचा प्रयत्न केला. परंतू काही वेळातच ट्रकने देखील पेट घेतला. दरम्यान, काही वेळातच महापलिकेच्या अग्निशमन पथाकाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणण्यात आली.
आग लागल्यानंतर शहर पोलीस वाहतूक शाखेचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूने जाणारे वाहून काही अंतरावर थांबविले. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थप्प झाली होती. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आग आटोक्यात आणण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी परिश्रम घेत आहे.