जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून चोरीला गेलेली दुचाकी भाऊंच्या उद्यानासमोर सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे सापडली. पोलिसांच्या मदतीने सदर दुचाकी मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आली. मात्र, याच ठिकाणी दुसऱ्या दुचाकीची चोरी झाल्याने परिसरात चोरट्यांचा वावर वाढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जयेश भागवत पाटील यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीबी ०५६०) ही सोमवारी २४ मार्च रोजी दुपारच्या सुमारास नवीन बसस्थानक आवारात पार्कींगला लावलेली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यातही आली होती. दरम्यान जयेश पाटील यांची दुचाकी भाऊंच्या उद्यानाजवळ सुरक्षा रक्षक मनोहर तायडे, हेमंत बाविस्कर, अजिंक्य बागुल, अशोक पाटील, सुभाष चौधरी, मंगलसिंग पाटील यांच्या सतर्कतेने चोरीला गेलेली दुचाकी मंगळवारी २५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आली. यावेळी भाऊंच्या उद्यान येथील सुरक्षा अधिकारी आनंद देसले यांनी रामानंद नगर पोलीसांनी या घटनेची माहिती दिली. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्याने रवी चौधरी यांनी चौकशी केली असता ही दुचाकी जयेश पाटील यांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ही दुचाकी मुळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आली.

याच कालावधीत भाऊंचे उद्यान येथील कर्मचारी पिराआप्पा गवळी यांची दुचाकी (एमएच १९ बीके ३४५२) ही दुचाकी चोरी गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान अज्ञात चोरट्याने सुरूवातील बसस्थानक येथून दुचाकी चोरली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी चोरलेली दुचाकी ही भाऊंच्या उद्यानाजवळ पार्कींग करून येथील कर्मचाऱ्याची दुचाकी चोरून नेली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.



