नवी दिल्ली प्रतिनिधी । स्टेट बँकेने ‘इमिजिएट पेमेंट सर्व्हिस’ अर्थात ‘आयएमपीएस’ ही ऑनलाइन रक्कम हस्तांतर करण्याची सुविधा ग्राहकांना मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली असून ती येत्या 1 ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार आहे.
‘इमिजिएट पेमेंट सर्व्हिस’च्या माध्यमातून अतिशय कमी वेळेत निधी हस्तांतर केला जातो. ही सेवा मोबाइल फोन, एटीएम, इंटरनेट बँकिंग आदींच्या मदतीने उपयोगात आणली जाते. ‘आयएमपीएस’च्या मदतीने अतिशय कमी वेळात संबंधिताच्या खात्यामध्ये जमा केली जाते. ही सुविधा ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या (एनपीसीआय) माध्यमातून उपलब्ध करून दिली जात असून येत्या एक ऑगस्टपासून या सेवेवरील शुल्क हटविण्यात येणार आहे. तत्पूर्वी, बँकेने 1 जुलैपासून ‘आरटीजीएस’ आणि ‘एनईएफटी’ या सेवांवरील शुल्क रद्द केले. मात्र, आता ‘आयएमपीएस’वरील शुल्क हटवल्याने स्टेट बँकेच्या ग्राहकांना ऑनलाइन रक्कम हस्तांतर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. या सुविधेच्या माध्यमातून २४ बाय ७ निधी हस्तांतर केला जातो. या सेवेचे वैशिष्ट म्हणजे हस्तांतर केलेला निधी रिअल टाइममध्ये प्राप्त होतो. ग्राहकाने २४ तासांमध्ये कधीही रक्कम संबंधिताच्या खात्यात हस्तांतर केली असता, ती तत्क्षणी जमा होते.