जळगावात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरी ; १० लाखाचा ऐवज लंपास (व्हीडीओ)

62e6238e 2528 4ab2 ab84 a88df472c9cd

 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अयोध्या नगर परिसरातील सद् गुरु नगरमध्ये धाडशी घरफोडी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी साधारण १० लाखाचा ऐवज लंपास केल्याचा अंदाज आहे. दरम्यान, चोरी झाली ते घर सेवानिवृत्त विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश नामदेव मेढे यांचे आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, प्रकाश मेढे हे नुकतेच अक्कलकुवा येथून विभागीय पोलीस अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. मागील आठ दिवसापासून ते आपल्या पत्नीच्या उपचारार्थ नाशिक येथे गेलेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंदच होते. परंतू आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे दोन दिवसाआड साफ-सफाई करण्यासाठी मोलकरीण आल्यावर तिला मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडलेले दिसले. तिने तात्काळ श्री.मेढे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मेढे यांनी आपल्या नातेवाईकांना घटनास्थळी पाठवले. घरातील सर्व सामान चोरट्यांनी अस्तव्यस्त केलेला होता. घरातील ३ कपाटही चोरट्यांनी फोडली होती.

 

चोरट्यांनी साधारण ५१ हजाराची रोकड, १६ तोळे सोने, ३०० ग्रॅम चांदी, महागड्या घड्याळ,साडीसह इतर काही वस्तू चोरीला गेल्या. आहेत. प्राथमिक अंदाजानुसार साधारण १० लाखाचा ऐवज चोरीला गेला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर झालेत. पंचनामा केल्यानंतर घटनास्थळावर ठसे तज्ञांना प्रचारान करण्यात आले होते. तर श्वान पथकाची देखील मदत घेण्यात आली. दरम्यान, चोरट्यांनी गुटखा खाऊन घरात काही ठिकाणी थुंकून ठेवलेले होते. या घटनेमुळे शहरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले असून पोलिसांनी रस्त्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.

 

Protected Content