जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जुना खेडी रोडवर असलेल्या देविदास नगरात धाडशी चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आलीय. याठिकाणी चोरट्यांनी तब्बल एक लाखाचा ऐवज लंपास केला आहे. विशेष म्हणजे घरातील लोकं पुढच्या खोलीत झोपलेले असतांना चोरट्यांनी ही धाडशी चोरी केलीय.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युवराज अशोक नेहते (वय 40 रा. देविदास नगर, जुना खेडी रोड जळगाव) हे खाजगी कंपनीत नोकरीला आहेत. 23 जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कामावरुन आल्यानंतर कुटुंबासह त्यांनी जेवण केले. रात्री जेवण झाल्यानंतर पुढच्या हॉलमध्ये सर्व जण झोपलेले असतांना रात्री १० ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी किचनचा मागील दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील ठेवलेले ३० हजार रुपये किंमतीचे दीड तोळ्याची सोन्याची मनी मंगळसूत्रची पोत, २५ हजार रुपये किमतीची 12 ग्रॅम वजनाचे कानातील कर्णफुल, ८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, ८०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने यासह दोन महिन्याचा पगार असलेला ४० हजार रुपये रोख,असा एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.
घरफोडी झाल्यानंतर सकाळी ९ वाजेच्या सुमारास शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विभागीय पोलीस अधीक्षक निलाभ रोहम यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. तसेच शनिपेठ पोलीस स्थानकाचे सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, नितीन बाविस्कर यांच्यासह आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. युवराज नेहते यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हकीम शेख करीत आहे.