अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील 1 नोव्हें. 2005 रोजी व त्यानंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शासकीय, निमशासकीय व शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी याना NPS ऐवजी जुनी पेंशन योजना (OPS)लागू करण्यात यावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य कर्मचारी आणि शिक्षक संघ समन्वय समितीच्या वतीने बुधवार 21 सप्टेंबर 2022 रोजी “राज्यव्यापी बाईक रॅली” चे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील 1 नोव्हें.2005 रोजी वा त्यांनंतर सेवेत दाखल सर्व शासकीय/निम शासकीय व शिक्षक/कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागू करावी या मागणीच्या पूर्ततेसाठी राज्यातील संघटनांकडून अनेकवेळा सातत्यपूर्ण सनदशीर आंदोलने करण्यात येत आहेत.
लोक कल्याणकारी प्रगतीशील व पुरोगामी म्हणवणाऱ्या आपल्या राज्यात शिक्षक/कर्मचारी यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निश्चित हमी देणारी “जुनी पेंशन योजना”लागू करण्यासंबंधीची उदासिनता धोकादायक व धक्कादायक आहे.शिवाय या विषयावर वेळोवेळी अनेक आंदोलने सतत होत असूनही शासनस्तरावरील कर्णबधीर उदासीनता पेन्शनच्या सामाजिक प्रश्नांकडे शासनाच्या प्राधान्यक्रमाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. महाराष्ट्रापेक्षा सिमीत प्रगती व संसाधने असलेल्या छत्तीसगड,गोवा आदि राज्यांनी NPS ऐवजी जुनी पेंशन(OPS)लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.राज्यातील आमदार-खासदार यांना NPS योजना लागू न करता केवळ शिक्षक कर्मचारी यांना लागू करणे अन्यायकारक आहे असे ओबीसी शिक्षक असोसिएशनचे राज्याध्यक्ष विलासराव पाटील त्यांनी म्हटले आहे.
जळगांव जिल्ह्यातील सर्व ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व संघटनेच्या सभासदांनी उद्याच्या जुनी पेन्शन बाईक रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन, जिल्हा महिला अध्यक्षा वसुंधरा दशरथ लांडगे,कार्याध्यक्ष बी.आर. महाजन धरणगाव, डि.ए.सोनवणे, सोपान भवरे,पी.एस.विंचूरकर, एन.आर.चौधरी, मनोहर पाटील, सल्लागार दशरथ लांडगे, सौ भारती चव्हाण, यांनी केले आहे.