भुसावळ प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेच्या १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाची रक्कम जिल्ह्यातील विविध विधायक कामासाठी वापरण्यात यावी, अशा मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा परिषदेच्या १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाची रक्कम तब्बल ४ ते ५ कोटी रुपये असून या रकमेचा वापर जिल्ह्यातील कुठल्या तरी विधायक कामासाठी व्हावा, म्हणून आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणांवर ताण पडलेला असून रुग्णांना दवाखान्यापर्यंत आणण्यासाठी पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध व्हावा. म्हणून या पैशात जिल्ह्यासाठी सोलापूर, कोल्हापूर, सांगली सारख्या जिल्ह्याच्या धर्तीवर २० रुग्णवाहिका देण्यात याव्यात, या आशयाचं निवेदन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य दिपक पाटील यांनी निवेदन दिले.