पाचोरा, प्रतिनिधी । शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत हे आज येथे जळगाव संपर्क दौऱ्यावर आले असतांना जळगांव शिक्षक सेनेच्यावातीने त्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे आज येथे जळगांव संपर्क दौऱ्यावर आले असतांना जळगांव शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, जिल्हा सरचिटणीस नाना पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संदिप पवार यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. निवेदनात कोविड महामारीदरम्यान मयत झालेल्या शिक्षकांना विनाअट, सरसकट सानुग्राह अनुदान ५० लाख रुपये देण्यात यावे, राज्य शासकिय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०-२०-३० सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरीत लागू करावी, डी. सी. पी. एस. योजना बंद करून जूनी पेंशन योजना लागू करावी, सी. एम.पी. वेतन प्रणाली त्वरीत लागू व्हावी, वैदयकिय बिलांसाठी पोलिस विभागाप्रमाणे कॅशलेस सुविधा लागू करावी, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी ही पदे मोठ्या संख्येने रिक्त असून ती त्वरीत भरण्यात यावीत, तसेच अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक इ.पदोन्नती लवकर करण्यात यावी, बाह्यसंस्थेमार्फत शिक्षकांचे मूल्यमापन करण्यात येवू नये, अनुकंपा भरती त्वरीत करून मयत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबाला न्याय दयावा. अशा मागण्यांचा समावेश असून लवकरच या शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन खासदार संजय राऊत यांनी शिक्षक सेना पदाधिकाऱ्यांना दिले.