यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कोळवद गावातील महिलांनी कोळवद गावातील दारूबंदी संदर्भात पोलीस निरीक्षकांसह, सरपंच याकुब तडवी आणि ग्रामपंचायत सदस्यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात “आम्ही कोळवद गावातील तमाम महिला विनंती करतो कि, आमच्या यावल तालुक्यातील कोळवद गावात हातभट्टीचे एकूण ११ अड्डे असून या दारूमुळे तरुण पिढी खुप मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. गावातील पुरुष रोज दारू पिवून आपल्या कुटुंबाला तसेच गल्लीतील लोकांना गलिच्छ भाषेत शिविगाळ करतात. रात्रभर लोकांना झोपू देत नाहीत. या दारूमुळे अनेक घर उध्वस्त झाली आहे. अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत.
यावल शहरासह तालुक्यात सर्वत्र गावठी हातभट्टीची व अत्यंत घातक रसायनाव्दारे तयार करण्यात येत असलेली दारू प्लास्टिकच्या पिशवीत सार्वजनिक ठिकाणी खुलेआम विक्रीला केली जात आहे. या घातक दारूमुळे अनेक तरुण मृत्युच्या वेटींग लिस्टवर आले असून पोलीस प्रशासनाने या अवैद्य धंद्यावर तात्काळ कार्यवाही करून दारूच्या व्यसनामुळे तरुणांचे जीवन आणि त्यांच्या कुटुंबाला उद्धवस्त होण्यापासून वाचवावं. अशी मागणी तालुक्यातील महिलांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.