चाळीसगाव प्रतिनिधी । आयडियल जर्नालिस्ट असोसिएशनने बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना सातारा येथे असोसिएशनच्या 21 व्या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले असून पत्रकारांच्या मागण्यांबाबत निवेदन दिले आहे.
देशात आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघ हे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढत आहे. दरम्यान पत्रकारांना विविध शासकीय सुविधा मिळाव्यात यासाठी जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघाने मुंबई गाठून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देऊन सातारा येथे होणाऱ्या संघटनेचे 21 वे राष्ट्रीय अधिवेशनासाठी आमंत्रित केले आहे. सदर निवेदनात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेत आणि रेल्वेत मोफत प्रवास, हक्काचे घरकुल, आरोग्यासाठी मोफत वैद्यकीय सेवा, पत्रकारांच्या मुलांना मोफत शिक्षण व त्यांना शालेय शिष्यवृत्ती मिळावी, आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनच्या पत्रकार संघटनेला दैनंदिन कामकाजासाठी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी २ गुंठे शासकीय जमीन कार्यालयासाठी विनामूल्य/नाममात्र शुल्क आकारून उपलब्ध करून द्यावी, वृत्त संकलन करतांना पत्रकारांचा दुर्दैवाने अपघातात किंवा अन्य कारणाने मृत्यू झाल्यास पीडित पत्रकारांच्या परिवारास २० लाखांचा जीवनविमा राज्य सरकारने मंजूर करावा, दुर्घटना झाल्यास वैद्यकीय उपचारा करिता आर्थिक मदत मिळावी, शासकीय रुग्णालयात मोफत उपचार देण्यात यावा, पत्रकारांना मासिक मानधन आणि वयोवृद्ध पत्रकारांना निवृत्ती वेतन द्यावे, वृत संकलन करत असताना अथवा सत्य समाजासमोर आणत असताना पत्रकारांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा तसेच धमक्या, मारहाण, जीवाला धोका यासह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यासाठी पत्रकारांना पोलीस सरंक्षण द्यावे, समाज कंटकांवर उचित कायदेशीर कारवाई, कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावत असताना अनेक पत्रकार मरण पावले. त्यांच्या परिवाराला शासनाने तातडीने रु.५०,००,०००/- ( पन्नास लाखांची) आर्थिक मदत करावी अशा विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सदर मांडण्यावर विचार करून पत्रकार बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन असे मुख्यमंत्री यांनी आश्वासित केले.
याप्रसंगी पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील उपस्थित होते. दरम्यान निवेदनावर आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव आबासाहेब सूर्यवंशी (पाचोरा, जि जळगाव),महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत कदम (चाळीसगाव, जि जळगाव), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर बोराटे (पाचवड जि सातारा), महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख सचिन शिंदें (ठाणे), विधी व न्याय महाराष्ट्र सल्लागार प्रमुख ऍड मंगेश तिरोडकर (ठाणे), वाई (जि सातारा) तालुका अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सह्या आहेत.