मुंबई प्रतिनिधी । एकीकडे मराठा समाजाने आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला असतांना आता धनगर समाजानेही एस.टी.च्या सवलती मिळाव्यात या मागणीसाठी उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे.
धनगर समाजातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत २१ सप्टेंबरपासून धनगर समाजाच्या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन उभारण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
याबाबत धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे म्हणाले की, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठाकरे सरकारनं अध्यादेश काढून धनगरांना एसटीचं आरक्षण लागू करावं, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात, तालुका पातळीवर आंदोलन करण्यात येईल अशी माहिती शेंडगे यांनी दिली आहे.
तसेच या आंदोलनाची सुरुवात परभणीपासून होईल, येत्या आठवडाभरात आंदोलनाचा नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येईल. मराठा आंदोलनात बहुजन समाजानेही साथ दिली होती. ओबीसी आरक्षणला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असंही प्रकाश शेंडगे यांनी सांगितले आहे.