मुंबई वृत्तसंस्था । एमपीएससीकडून १३ सप्टेंबरला होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला असून आता २० सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. एमपीएसीकडून पत्रकाद्वारे अधिकृतरित्या हे जाहीर करण्यात आले आहे.
करोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तिसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक १७ जून रोजी जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार होत्या. मात्र, १३ सप्टेंबर रोजी देशभरात नीट परीक्षा होणार असून त्याच दिवशी राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार होती. त्यामुळे एमपीएससीने पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.