जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आंतर अभियांत्रिकी पदविका विद्यार्थी क्रीडा संघटना यांच्या वतीने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय (तंत्रनिकेतन) येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले. १२ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या या स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडल्या.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जळगावच्या महापौर दीपमाला काळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच डॉ. वर्षा पाटील (सचिव, गोदावरी फाउंडेशन), डॉ. पराग पाटील (प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन जळगाव) आणि डॉ. विजयकुमार पाटील (प्राचार्य, गोदावरी तंत्रनिकेतन) हे मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविकात स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश, नियोजन आणि खेळाडूंना उपलब्ध करून दिलेल्या सुविधा यांची माहिती दिली. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडास्पर्धांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. महापौर दीपमाला काळे यांनी आपल्या मनोगतात शालेय व महाविद्यालयीन जीवनातील क्रीडा स्पर्धांचे महत्त्व स्पष्ट करत राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रगती करण्याचे आवाहन केले.
मुंबई, रायगड, नाशिक, पालघर, सोलापूर, सांगोला, चांदवड, चंद्रपूर, संगमनेर, सांगली, अंबड, जालना, इंदापूर, पुणे, अहिल्यानगर, लातूर आदी जिल्ह्यांतील अ ते फ झोनमधील संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. कबड्डी व खो-खो या दोन्ही स्पर्धांमध्ये अत्यंत चुरशीचे सामने रंगले.
कबड्डी स्पर्धेत शिवाजी पॉलिटेक्निक महाविद्यालय यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर शासकीय निवासी महिला पॉलिटेक्निक यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. खो-खो स्पर्धेत श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर शासकीय निवासी महिला पॉलिटेक्निक, तासगाव यांनी उपविजेतेपद पटकावले.
समारोपप्रसंगी पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक, पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना उत्स्फूर्त प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नेहा चौधरी व प्रा. वैष्णवी नारखेडे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. दीपक झांबरे, डॉ. जयंत जाधव, प्रा. दीपेश भुसे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधींनी विशेष परिश्रम घेतले.



