मुंबई, वृत्तसंस्था | भाजपात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी आज (दि.३१) प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर इतरही नेते भाजपात येतील, असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक या सगळ्यांचा भाजपात प्रवेश झाला आहे. तसेच काँग्रेसचे नेते कालिदास कोळंबकर यांनीही भाजपात प्रवेश घेतला आहे. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
आम्हाला वाट दाखवणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानतो. यापुढे आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण करायचे आहे आणि त्याचमुळे माझ्यासहीत या सगळ्यांनीच भाजपात प्रवेश केला आहे, असे मधुकर पिचड यांनी म्हटले आहे. आम्हाला सगळ्यांना हा विश्वास आहे की, यापुढेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप चांगले काम करतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली पुढील वाटचाल करायची आहे असेही पिचड यावेळी म्हणाले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांनाही टोला लगावला आहे, शरद पवार असे म्हणत आहेत की, ईडीच्या कारवाईची धमकी देऊन पक्षांतर केले जात आहे, मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नाही. तुम्ही जेव्हा शिवसेनेतून गणेश नाईक, छगन भुजबळ यांना फोडले त्यांना अशीच धमकी दिली होती का ? असाही प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी यावेळी विचारला. ‘राईट पर्सन इन द राईट पार्टी’ हे आजचे भाजपाचे चित्र आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक:- महाराष्ट्रात आपल्या कारकिर्दीने ज्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे दिग्गज लोक भाजपाच्या परिवारात आले आहेत. याचा मला मनस्वी आनंद होतो आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घ अनुभव असलेले मधुकर पिचड भाजपात आले हे महत्त्वाचे आहे. त्यांची एखादा विषय हाताळण्याची हातोटी महत्त्वाची आहे. शिवेंद्रराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत, ते भाजपात येणे ही आनंदाची बाब आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसंच कालिदास कोळंबकर हे लोकांमधून आलेले नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला निश्चितपणे होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं.