मुंबई प्रतिनिधी । राज्य सरकारने पूरग्रस्तांना आता रोखीने मदत करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत जिल्हाधिकार्यांना आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत वृत्त असे की, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कालच राज्य सरकारने जीआर काढला होता. यातील काही अटी या समाजमाध्यमांवर चांगलेच टिकेचे लक्ष्य बनल्या. विशेष करून दोन दिवस पाण्यात असेल तरच मदत मिळेल या अटीवर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. यासोबत पूरग्रस्तांना मिळणारी मदत ही त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र यावरूनदेखील टीका झाल्यामुळे आज अखेर राज्य सरकारने पूरग्रस्तांना रोख मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या मदतीचे अधिकार कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत. जिथे गरज असेल तिथे रोखीने मदत करण्यात यावी अशी निर्देश देण्यात आले आहेत. पूरग्रस्त तसेच पुरात मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना ही मदत करण्यात येणार आहे.